महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार

55

नाशिक, दि. २८ (जिमाका): महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

कवी कालिदास नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री‌ श्री. फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, श्री. कारंजेकर बाबा, श्री. चिरडे‌ बाबा, आचार्य अमरावतीकर बाबा, आचार्य विद्वान बाबा, बाभूळगावकर बाबा शास्त्री, नांदेडकर महाराज, श्री. बीडकर बाबा (रणाईचे), प्रकाश नन्नावरे, अविनाश ठाकरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महानुभाव पंथाने अतुलनीय ग्रंथसंपदा  समाजाला दिली आहे. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभाव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले.  चक्रधर स्वामींचा विचार समाजाला समतेकडे नेणारा आहे. विषमता मुक्त समाज निर्माण करण्याचे काम महानुभाव पंथाकडून अविरतपणे सुरू आहे.

महानुभाव पंथाशी माझे अतिशय जवळचे ऋणानुबंध आहेत. यातूनच रिद्धपूर विकास आराखडा, रिद्धपूर येथे मराठी भाषेचे पहिले मराठी विद्यापीठ स्थापन केले. रिद्धपूर येथे विद्यापीठ स्थापनेबरोबरच देशांतील अभ्यासक आले पाहिजेत, अशी विद्यापीठाची अप्रतिम इमारत व ग्रंथसंपदा तयार करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच महानुभाव पंथातील महत्त्वाचे मठ, स्थळे, मंदिरांच्या विकासासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आजचा सोहळा माझ्यासाठी कृतज्ञता सोहळा नसून महानुभाव पंथाचा आशीर्वाद ग्रहण करण्याचा सोहळा असल्याची भावनाही त्यांनी यावेळी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केली‌. महानुभाव पंथातील ग्रंथांचे स्मृती चिन्ह, मानपत्र व मोत्यांची माळ देऊन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी चिरडे बाबा, अविनाश ठाकरे, कारंजेकरबाबा यांची भाषणे झाली.  माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रास्ताविक केले.

०००



Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Aggregated From – Team DGIPR