नाशिक, दि. २८ (जिमाका): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिकं आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि दिशा देणारी असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री श्री. भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ, वस्तू सल्लागार श्याम लोंढे, श्री. नागरे, पंकज काळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदार श्रीमती हिरे, आमदार श्रीमती फरांदे यांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध कामांचे ई- उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, फुले दाम्पत्याचे काम उत्तुंग आहे. त्यांच्या आदर्शांवर वाटचाल करणे हे आपले कर्तव्य आहे. राज्यातच सामाजिक समतेचा पाया घातला गेला. महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य असण्यामागे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपले गुरू मानले होते. महात्मा फुले यांनी ब्रिटीश साम्राज्याला आव्हान देत शेतकरी, कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडत तत्कालिन व्यवस्थेवर आसूड ओढले. पुणे येथील भिडे वाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेचे स्मारकात रुपांतर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात औद्योगिक, पायाभूत सुविधामुळे मजबूत होण्याने राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यातून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात चांगले काम करता येणार आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सिंचन, रोजगार-स्वयंरोजगार, उद्योग, कौशल्य विकासात आपण सर्व घटकांचा विचार करीत आहोत. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची वाट प्रशस्त करून दिली. आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, संविधानाचा मार्ग दाखविला आहे. त्याच मार्गावरून आपल्याला वाटचाल करायची आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारणांसाठी लढा दिला. ते युगपुरुष होते. त्यांनी असामान्य कामगिरी बजावली. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मंत्र दिला. त्यामुळे परिवर्तन घडून आले. सामाजिक कार्यात त्यांचे नाव अग्रेसर राहील, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समतेचा लढा देत स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर देश उभा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. मुलींची देशातील पहिली शाळा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तेथे मुलींची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूळ गावी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करण्यात येईल, असे सांगत त्यांनी नाशिकमध्ये उभारण्यात आलेले स्मारक उत्तम असून नाशिकच्या वैभवात भर घालणारे आहे, असे सांगितले.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यात विविध संकटांचा सामना केला. त्यानंतर ही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. त्यांनी सर्व क्षेत्रात कामगिरी बजावली. त्यांनी विविध सामाजिक प्रश्न हाताळले. प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांच्या कार्याचा सर्वच मान्यवरांनी गौरव केला आहे. त्यांनी सर्वच पंथांचा विचार केला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळे हे देशातील सर्वांत मोठे अर्धाकृती पुतळे आहेत. त्यांनी केलेले काम कायम संस्मरणीय आहे. सर्वांना शिक्षण, शेतकऱ्यांना मदत आणि महिलांचे सबलीकरण हे सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न साकारण्याचे काम राज्य शासन करीत आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त स्मिता झगडे यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००
Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.