मालेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण

52

महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) : मालेगाव शहरातील कॅम्प भागात महिला व बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार केले जातील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले

मालेगाव, जि. नाशिक येथे आज दुपारी १०० खाटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, मुख्यमंत्री जनकल्याण विभागाच्या समन्वयक डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, मालेगाव शहरासाठी सुरुवातीला ४० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले. पुढे त्याची क्षमता १०० खाटापर्यंत वाढविण्यात आली. या रुग्णालयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. नव्याने सुरू केलेल्या रुग्णालयात महिला आणि बालकांवरील उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.

या रुग्णालयात विविध सुविधा पुरवित दरमहा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयाची शिस्त आणि स्वच्छता प्रत्येकाने पाळली पाहिजे. रुग्णालयात सीसीटिव्ही कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच पोलिस चौकी उभारण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

डॉ. कानिटकर म्हणाल्या की, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक महिलेने या रुग्णालयाचा लाभ घ्यावा. विकसित भारत घडविण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. प्रसुतीसाठी महिलांनी रुग्णालयातच दाखल व्हावे. बालकांना प्रत्येक डोस देत लसीकरण करून घ्यावे. त्याची मोफत सुविधा आहे. त्याबरोबरच महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.

डॉ. शिंदे म्हणाले की, मालेगाव येथे महिला व बाल रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासाठी पालकमंत्री श्री. भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले. अतिशय सुसज्ज असे रुग्णालय साकारले आहे.

डॉ. वाघमारे म्हणाल्या की, अतिशय अत्याधुनिक असे रुग्णालय आहे. त्याचा सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना लाभ होणार आहे.

यावेळी महिला, नागरिक, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

असे आहे महिला व बाल रुग्णालय

आपत्कालिन वैद्यकीय सेवा 24/7
मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर
मॉड्यूलर लेबर रुम
क्ष – किरण व सोनोग्राफी सुविधा
प्रयोगशाळा तपासण्या , रक्त साठवणूक केंद्र
रुग्ण्वाहिका / मोफत संदर्भ व वाहतूक
मोफत औषध उपचार व पुरवठा
प्रसुतीपूर्व व पश्चात तपासणी
सिझेरीयन प्रसुती
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया , इतर स्त्री रोग
नवजात व लहान मुलांची तपासणी व उपचार
नियमित लसीकरण
हिरकणी कक्ष , कांगारु मदत केअर

०००००



Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Aggregated From – Team DGIPR