नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

48

  • नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी साधला संवाद

नाशिक, दि. ९ (जिमाका): आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून राज्यपाल पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. भुसे यांनी नार – पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे आभार मानले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ, खासदार श्री. भगरे, आमदार श्री. दराडे, आमदार श्री. इस्माईल, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, आमदार श्री. खोसकर, आमदार श्री. पवार यांनी आपले जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपालांना माहिती दिली.

०००



Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Aggregated From – Team DGIPR